कधी-कधी
साध्यासोप्या वाटणार्या गोष्टीतच खूप अडथळे येतात. थोडे प्रयत्न
केल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला अनुकूल व्हाव्यात असे वाटते. पण वारंवार
प्रयत्न करूनही तसे घडत नाही. आपण वैतागतो. त्रागा करतो. प्रयत्न सोडून
देतो. नशिबाला दोष देत चिडचिड करतो. काहीही कष्ट न करता इतरांना त्या
गोष्टी सहज मिळाल्या असे म्हणत कुढत बसतो. त्या गोष्टी सहज मिळण्याची त्या
लोकांची लायकी नव्हती असे म्हणतो. तुमच्याही बाबतीत असं घडलंय का कधी ? मग
सुरवंटाचं फुलपाखरू होण्याची गोष्ट खास तुमच्यासाठी. सुरवंट आपल्या कोशातून
बाहेर यायला सुरुवात करतो इवल्याशा छिद्रातून. त्या छिद्रातून तो आपले
शरीर बाहेर काढतो. त्या वेळी त्याला खूप धडपड करावी लागते. या धडपडीमध्ये
अनेकदा खूप दिवसही लागतात. या धडपडीदरम्यान निसर्ग त्या फुलपाखराच्या
शरीरातील द्रव पंखामध्ये ढकलतो. त्यामुळेच त्या फुलपाखराला कोशातून बाहेर
पडल्यावर लगेच उडण्याचे बळ मिळते. पण हेच जर इवल्याशा छिद्रातून फुलपाखरू
बाहेर पडताना त्याला त्रास नको म्हणून त्या कोशाचे छिद्र कापून मोठे केले
तर? तर त्या फुलपाखराला नीट
से उडता येणार
नाही. त्याचे शरीर विचित्र आकाराचे बनेल. पंखांची वाढ होणार नाही.
पर्यायाने निसर्गदत्त उडण्याचे बळ त्याच्या पंखांमध्ये येऊ शकणार
नाही.म्हणूनच स्वकष्टावर मुक्त विहरण्यासाठी त्या फुलपाखराला स्वत: धडपड
करावी लागते. निसर्गाने निर्माण केलेले अडथळे पार करावे लागतात. अगदी
गरुडभरारीचे नसले तरी अवकाशात झेप घेण्याचे बळ, कुवत निसर्गाने प्रत्येकाला
दिलीय. ती झेप घेताना पदोपदी अडथळे निर्माण केलेत तसेच प्रयत्नातले सातत्य
राखण्याची संयमी वृत्तीही बहाल केलीय. अपयश दिलेय तसेच प्रयत्नांची कास
धरण्याची हिंमतही दिलीय. आयुष्यात अडथळे निर्माण केलेत तसेच अडथळे पार
केल्यानंतरच्या यशाची गोडी चाखण्याची संधीही प्रत्येकाच्या वाट्याला दिलीय.
म्हणूनच वाटते की अडथळ्यांनी वैतागून जाण्यापेक्षा त्यांच्याकडूनच
झेपावण्याचं बळ मिळवलं तर ? सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सगळे आयते मिळाले
तर कुणीही अटकेपार झेंडा लावेल. पण स्वत:च्या मेहनतीने, कष्टाने, अडथळे पार
करत गरुडभरारी घेण्याचे सुख काही औरच असते नाही का ?
No comments:
Post a Comment